Top Updates

6/recent/ticker-posts

पालक व पाल्य

पालक व पाल्य

आज पाहायला गेलं तर प्रत्येक घरातील पालकांची समस्या एकच आहे ती म्हणजे आमचा पाल्य आमचे ऐकत नाही.

मुलांना शिस्त नाही, अभ्यासाचे वेड नाही, सारखा टीव्ही पाहतो, मोबाईल घेऊन मोबाईलवर गेम खेळणे, youtube पाहणे यात पूर्ण दिवस घालवतो अशा चर्चा घराघरात ऐकायला येऊ लागल्या आहेत.

या गंभीर विषयावर पालकांनी काय केले पाहिजे?

पालकांना थोडा आपला भूतकाळ पहावा लागेल.

त्यावेळी आपल्या घरात टीव्ही हा प्रकारच नव्हता.

आपले आई-वडील आपल्याला अभ्यास करा असे कधी म्हणत होते का?

आपला दिनक्रम काय होता?

मनोरंजनाची साधने काय होती?

आपण शाळा कशी शिकलो?

पूर्वीचे शिक्षक कसे होते?

आपल्या मनात  आई-वडील, शिक्षक यांच्या बद्दल किती आदर व सन्मान का होता?

पण आजच्या आपल्या या धावपळीच्या व तंत्रज्ञान युगामध्ये आपले कुटुंब चालवण्यासाठी आपण दिवसभर घराबाहेर असतो यामुळे आपला मुलांची संवाद कमी होत चालला आहे.

घरामध्ये टीव्ही व मोबाईल असल्यामुळे दिवसभर मुले टीव्ही व मोबाईलच्या विळख्यात सापडत आहेत.

टीव्ही व मोबाईल पाहून आज आपली मुले काय शिकत आहेत?

यावर लक्ष देणे खूप गरजेचे आहे.

आज पाचवी सहावी मध्ये शिकणाऱ्या मुलांना जे ज्ञान या तंत्रज्ञानातून मिळत आहे ते आपल्या काळात आपल्याला कधी मिळत होते?

याचा विचार करणे खूप गरजेचे आहे.

आपली मुलं टीव्ही किंवा मोबाईल पाहतो म्हणजे नेमके काय करतो? काय पाहतो? किती वेळ पाहतो? त्यातून काय घेतो?


यावर पालकांनी गांभीर्याने लक्ष ठेवणे खूप गरजेचे आहे.

बदलत्या युगामध्ये सामाजिक परिस्थिती जरी बदलत असली तरीही आपल्या मुलांच्यावर चांगले संस्कार होण्याच्या दृष्टीने आई-वडिलांनी, पालकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.

आपले आई-बाबा कसे वागतात? यावर आपल्या मुलांचे खूप बारीक लक्ष असते. 

मुले त्यांच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ सिगारेट ओडणाऱ्या आपल्या वडिलांना पाहून छोट्या बाळाला सुद्धा दोन बोटे तोंडाशी नेण्याचा मोह आवरत नाही.

त्या निष्पाप जीवाला खरे खोटे काहीच समजत नसते त्याला खोटे बोलायला किंवा आचरण करावयाला त्याच्या घरातील वातावरण अप्रत्यक्ष शिकवत असते. मुलासमोर आई-वडील भांडू लागले की मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होऊन मुले चुकीच्या मार्गावर जाऊ शकतात व त्यांना वाईट सवयी लागू शकतात. 

मुलांच्या संस्कारक्षम वयात जे संस्कार किंवा वळण मुलांना मिळते त्याचीच सोबत त्याला जीवनात मिळत असते आणि ही मिळणारी सोबत त्याला योग्य मार्गावर ठेवण्याच्या दृष्टीने उपयोगी पडते. यासाठी आई-वडिलांवर अधिक जबाबदारी पडते ती आपल्या मुलांचे जीवन सुसंस्कृत करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे.

उद्याचा आदर्श विद्यार्थी, आदर्श पाल्य, आदर्श नागरिक घडवण्याचे कार्य पालकांना करावयाचे आहे याची जाणीव आई-वडिलांनी, पालकांनी सतत बाळगल्यास त्यांच्या मुलांच्या संस्काराच्या बाबतीत येणारी समस्या फारसी भेडसावणार नाही.

पालकांनो तुमच्या पाल्याला समजून घ्या.

प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलाकडून बऱ्याच अपेक्षा असतात व त्या असणे साहजिकच आहे पण त्या आपल्या मुलांच्या क्षमतेविषयी अवास्तव अपेक्षा तर ठेवत नाही ना याचाही पालकांनी विचार करणे खूप गरजेचे आहे.

मुलाला शाळेत घातले म्हणजे त्यांनी अभ्यासात आघाडीवरच असले पाहिजे असा पालकांचा अट्टाहास असतो. आपले मूल वर्गात इतर मुलांच्या तुलनेत मागे पडले तर पालकांना धक्काच बसतो अशी आजची परिस्थिती पहावयास मिळत आहे.

जो स्वतःच्या मुलाला त्याच्यातील दोष घालवून त्याच्यात सदगुण आणण्यासाठी सहाय्य करतो तोच खरा पालक असतो.

सध्याची पालकांची व्याख्या म्हणजे जास्तीत जास्त महागडे कपडे घेणे, महागड्या शिकवणी वर्गाला पाठवणे,मुलांना जे हवे ते घेऊन देणे अशी झाली आहे.

मग आदर्श पालकत्त्वाची व्याख्या काय आहे

आदर्श व सुसंस्कारी पाल्य घडविण्यासाठी काय केले पाहिजे

हे आपण पुढील लेखात पाहणार आहोत. तरी आपण आमच्या ब्लॉगला फॉलो करा म्हणजे येणारे पुढील सर्व लेख आपल्याला नोटिफिकेशन द्वारे समजतील व आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

धन्यवाद.


Post a Comment

0 Comments