Top Updates

6/recent/ticker-posts

दुहेरी शिक्षक - शिक्षण व्यवस्थेला लागलेली किड

दुहेरी शिक्षक - शिक्षण व्यवस्थेला लागलेली किड

       विद्यार्थ्याचे उज्वल भविष्य निर्माण करण्यासाठी, गुणवंत विदयार्थी तयार करण्यासाठी, आदर्श नागरिक घडवण्यास प्रयत्नशील प्रामाणिक शिक्षक आणि त्याविरुद्ध पैशासाठी त्याच विद्यार्थ्यांच्या भविष्याबरोबर खेळणारा, पालकांची दिशाभूल करणारा, शालेय अंतर्गत गुण देण्याची किंवा कमी करण्याची भीती वा आमिष दाखवणारा, पैशासाठी आपली नीतिमत्ता गहाण ठेवत चालेला, शिक्षण व्यवस्थेला कीड ठरत असलेला आजचा दुहेरी शिक्षक.

         आज मोठ मोठ्या क्लासेस मध्ये पहिले तर काय चित्र दिसत आहे? क्लासेस-अकॅडमी मध्ये जे शिक्षक आहेत ते कोणत्या शाळा कॉलेजमध्ये शिकवत आहेत? एखाद्या ठरावीक क्लासमध्येच  प्रवेश घेण्यास शाळा कॉलेज मधील शिक्षक का दबाव टाकत आहेत? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आपण या लेखात प्रयत्न करणार आहोत.

      शाळा हे सर्व गुणांचे प्रशिक्षण केंद्र आहे आणि मुलांना योग्य मार्ग दाखवते. विद्यार्थ्यांमध्ये आवड आणि कुतूहल जागृत करणे हा शाळेतील शिक्षकांचा मुख्य उद्देश असला पाहिजे. आपल्या शाळांमधून परिक्षार्थी तयार करण्यापेक्षा खरे ज्ञानाकांक्षी, विवेकनिष्ठ प्रयोगवीर तयार होण्यासाठी प्रत्येक शाळा ही साक्षात प्रयोगशाळा झाली पाहिजे.

      पूर्वीच्या काळात आपल्याला शाळेमध्ये शिकवणारे शिक्षक, गुणवत्ता टिकवण्यासाठी प्रयत्न करत असत. आजदेखील बरेचसे शिक्षकमित्र याच हेतूने कार्य करतात. मात्र काही शिक्षकांच्याबाबतीत असे दिसून येत नाही. मग प्रश्न हा उरतो की शालेय स्तरावर गुणवंत विद्यार्थी घडवण्यासाठी खूप तळमळीने, आपुलकीने आजचा शिक्षक प्रयत्न करताना दिसत आहे का?

        आजचे हे स्पर्धेचे युग आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी तसेच, अन्य शैक्षणिक क्षेत्रांमध्ये प्रवेश मिळवणे हि गोष्ट आज जिकिरीची होऊन बसली आहे. याच कारणामुळे कॉलेज मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी जीवघेणी स्पर्धा सुरु झाली आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये आपला पाल्य नेहमी अग्रेसर असावा यासाठी पालकांची चाललेली धडपड याचा गैरफायदा हे दुहेरी शिक्षक घेताना दिसत आहे.

          आजकाल बरेच न्हवे तर  सर्वच  पालक आपल्या मुलांना शिकवणीला पाठवत आहेत किंवा पाठवण्याचा विचार करत आहेत. भारतात शैक्षणिक सहाय्य पुरवण्यासाठी शालेय शिक्षणाच्या औपचारिक व्यवस्थेच्या समांतर खाजगी क्लासेसची व्यवस्था अस्तित्वात आली आहे.

दुहेरी शिक्षक म्हणजे काय?

           दुहेरी शिक्षक याचा अर्थ शाळा, कॉलेजमध्ये शिकवत असलेले शिक्षक, शालेय शासनाचे वेतन असुनदेखील अतिरिक्त पैशासाठी वेळ मिळेल तेव्हा खाजगी शिकवणी घेत असतात शाळेत कमी आणी खाजगी क्लासवर जास्त लक्ष देतात. शासनाच्या विधेयक RTE २००९ कलाम क्र.२८ खाजगी शिकवणी कायद्यानुसार शाळा व कॉलेज मध्ये जे शिक्षक कार्यरत आहेत त्यांना खाजगी व्यावसायिक क्लासेस घेता येत नाहीत.

       नियमानुसार शाळेमध्ये संस्थेमध्ये अन्यथा महाविद्यालयामध्ये जर कोणी शिक्षक नोकरी करत असेल तर अशा शिक्षकाला खाजगी शिकवणी घेता येत नाही अशा शिक्षकावर दुहेरी शिक्षक म्हणून त्या शाळा महाविद्यालय किंवा संस्थेकडून कार्यवाही केली जाते. तरीही हे महाशय पैशासाठी स्वतःच्या खाजगी शिकवण्या थाटून बसले आहेत किंवा दुसऱ्या क्लासेस मध्ये पैशासाठी कामाला जात आहेत.

             खरंच असा दुहेरी शिक्षक आपल्या पाल्यासाठी योग्य आहे जो शाळेमध्ये तीच गोष्ट शिकवतो जी अतिरिक्त पैसे घेऊन शिकवणीमध्ये शिकवली जाते तर मग आपण अशा दुहेरी शिक्षकाकडे आपल्या पाल्याला का पाठवतो? शाळेमध्येच हे शिक्षक विद्यार्थ्याला का समजून सांगू शकत नाहीत का? तर मग यांच्या खाजगी शिकवणीला पाठवल्यानंतर कोणता चमत्कार हे महाशय करतात? शाळेत 40 ते 50 विद्यार्थी असतात आणि आता क्लासेस मध्ये तर एका एका वर्गात 60 ते 100 विद्यार्थी बसवली जातात मग पालकांना हे कसे समजत नाही? हे शिक्षक आपल्या क्लासला येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयातील 20 अंतर्गत गुण पूर्ण देण्याची भीती वा आमिष दाखवतात. 12 वी विज्ञान शाखेच्या मुलांना प्रॅक्टिकल गुणांच्या बाबतीतही तेच.हे शिक्षक शाळा व महाविद्यालयातील पूर्ण क्षमतेने न शिकविता खाजगी शिकवणी मध्ये अधिक प्रभावी शिकवतात. काही शिक्षक तर कलासमध्ये शिकवलेला भाग शाळा वा कॉलेजमध्ये शिकवत नाहीत, जेणेकरून विद्यार्थी आपल्या क्लासला दाखल होतील.

          आज बेरोजगारी वाढत चालली आहे. बेरोजगार तरुण-तरुणी हातात पदव्या घेऊन नोकरीसाठी हेलपाटे मारत आहेत त्यांच्याकडे कौशल्य आहे त्यांच्याकडे योग्यता आहे तरीही त्यांना नोकरीची संधी मिळत नाही असे तरुण-तरुणीं आपले उदरनिर्वाह करण्यासाठी खाजगी क्लास घेतात आणी मनापासून विद्यार्थी घडवतात. पालकांनी आपल्या पाल्याचे उद्याचे उज्वल भविष्य व आदर्श नागरिक निर्माण करण्यासाठी  अशा शिक्षकांना संधी देणे खूप गरजेचे आहे.

          दुहेरी शिक्षकांनी आपले कर्तव्य शाळा-कॉलेजेस मध्ये प्रामाणिकपणे पार पाडले पाहिजे. आपल्याला संस्था,सरकार योग्य मानधन देते तर मग हव्यासापोटी हा दुहेरी शिक्षकाचा व्यवसाय करून करून विध्यार्थी व पालकांची का दिशाभूल करत आहेत? याचा सखोल विचार आजच्या सुजाण नागरिकांनी केला पाहिजे. या दुहेरी शिक्षकांवर संस्था, शाळा-कॉलेजेस मधील मुख्याध्यापकांनी, शासनाने यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे तरच हा शिक्षणाचा बाजार व शिक्षणाला लागलेली कीड थांबू शकते.        

              असे दुहेरी शिक्षक आपल्या आजू बाजूला असल्यास प्रथम  संस्था-शाळेमध्ये कळवावे. संस्थापक अथवा मुख्याध्यापक याची दखल घेत नसतील तर आपल्या स्थानिक शिक्षण संचालक कार्यालयामध्ये जाऊन या शिक्षकांची तक्रार करावी याची शासन दखल घेऊन या शिक्षकांवर कारवाई करते.

सुजाण पालकांनो ज्या शिकवणीमध्ये खाजगी क्लासेस मध्ये असे दुहेरी शिक्षक आहेत त्या क्लासेस मध्ये आपल्या पाल्याला पाठवून त्याचे नुकसान करून घेऊ नका तसेच या बेकायदेशीर गोष्टीला चालना देऊ नका.

लेखक - संपादक 

डॉ. प्रफुल्ल प्रकाश पाटील 

Post a Comment

0 Comments