Top Updates

6/recent/ticker-posts

'हे' वाचा, दुधाविषयीचे अनेक गैरसमज दूर होतील.....

 'हे' वाचा, दुधाविषयीचे अनेक गैरसमज दूर होतील.....

             पोस्ट कोव्हिड उपयोगी व बल वाढवणारे रसायन समजल्या जाणाऱ्या दुधाविषयी. दुधाविषयीचे अनेक जणांमध्ये खूप सारे गैरसमज असतात व त्यामधून त्याचा वापरही कमी होतो याविषयी आज सविस्तर माहिती पाहुयात... 
            दूध हे जेव्हा शेळी, गाय, मेंढी यांच्याकडून प्राप्त होते. तेव्हा काढल्या-काढल्या त्याला धारोष्ण असे नाव दिले जाते. असे धारोष्ण दूध हे अमृताप्रमाणे सर्वश्रेष्ठ होय (अर्थात स्वच्छतेच्या सर्व काळजा घेतलेले हव्यात).
          हेच दूध काही काळ ठेवल्यानंतर तसेच न तापविता वापरल्यास पचनास जड व शरीरात दोषांचे स्राव उत्पन्न करण्यास कारण ठरू शकते. मंद अग्नी वर तापवले तर पचनास हलके होते व स्रावही उत्पन्न होत नाही.
           दुधाचे जीवनीय, रक्तगामी, श्रमहर, संधानक, सर्व सात्म्य, शमन, शोधन (ही गोष्ट प्रमाण, प्रकृती, अवस्था यावर अवलंबून), तृष्णा शांत करणारे, क्षीण क्षत यांना उपयोगी पडणारे असे असंख्य कौतुक करण्यासारखे गुण आहेत.


        दूध हे उदर, शोथ, आम्लपित्त, गुल्म या व्याधींमध्ये उपयोगी, नवीन आलेला तापामध्ये वर्ज तर सात दिवसांपेक्षा जास्त निघून गेलेल्या तापामध्ये (जीर्ण ज्वर) गुळवेल सारखी सोन्यासारखी औषधी टाकून दिल्यास देहच सुवर्णमय करतात.
         अगदी मलप्रवृत्तीच्या गाठी बनत असतील तरी त्या ठिकाणी भेदन म्हणून उपयोगी ठरते. लघवी साफ करण्यासाठी दुधाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, या दुधाला तुपाची जोड दिल्यास आणखी गुण वाढतात.
      एखाद्या व्यक्तीला दूध हे बाधक होत असेल पण त्याला देणे आवश्यकच असेल तेव्हा युक्ती करून सुंठ,हळद, पिंपळी, केशर यापैकी काही औषधे टाकून दूध सिद्ध केले जाते व दिले जाते त्यातून त्याचे गुण तर काम करतातच परंतु बाधक ठरत नाही.
      काही व्यक्तींना दूध पचतच नाही. अशावेळी अशा व्यक्तीची विकार, प्रकृती, अवस्था पाहून ग्रहणीसारख्या विकारांना ध्यानात घेऊन चिकित्सा केल्यास रुग्ण दूध देखील पचन करू लागतो.
      लहान वयात दूध भूक वाढवणारे तरुण वयात बल देणारे तर वृद्धापकाळात वीर्यवर्धक असे ठरते. सकाळी दूध घ्यावयाचे झाल्यास गाईचे घ्यावे, सायंकाळी म्हशीचे चालेल (अष्टांग संग्रह टीका).
       दूध कशाबरोबर घेऊ नये हेही खूप महत्त्वाचे. यामध्ये मीठ, खारी/ टोस्ट/ ब्रेड/ बिस्किटसारखे पिष्टमय अन्न, उडीद, मुग, कंदमुळे, आंबट पदार्थ याबरोबर घेतल्यास विरुद्ध (चुकीचे) ठरते.



Post a Comment

0 Comments