योगा YOGA

सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये आपले
शरीराकडे लक्ष देणे थोडे कमी झाले आहे. म्हणून या धकाधकीच्या जीवनात योग शिक्षणाची
गरज मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. अन्न, वस्त्र,
निवारा या मुलभूत गरजांबरोबरच योग शिक्षण
ही आधुनिक काळात मानवाची महत्त्वाची गरज बनली आहे.
तुमची जीवनशैली उत्कृष्ट करावयाची असेल तर
तुमच्या जीवनात योगाचा समावेश करावा लागेल. योग हा शब्द ‘युज’ या संस्कृत शब्दापासून बनला असून त्याचा अर्थ जोडणे असा होतो.
योग ही आदि-अनादी काळापासून चालत आलेली
भारतीय विद्या आहे. योगाची आठ अंगे सांगितली आहेत ती म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार,
धारणा, ध्यान व समाधी.
२१ जून हा 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' म्हणून साजरा केला
जातो. योगाचा सराव केल्याने व्यक्तिमत्त्वाचा विकास होऊन सर्वांगीण प्रगती करता
येते. योगासनांमुळे मन:शांती मिळते. योगा केल्यामुळे आपलं शरीर नेहमी निरोगी आणि
आपले मन कायम प्रफुल्लीत राहते.

योग करणारा व्यक्ती कोणत्याही आव्हानांना
सामोरे जाण्यासाठी सदैव सज्ज असतो. आसन ही योगाभ्यासाची फक्त एक प्राथमिक पायरी
आहे.निरोगी व सुदृढ शरीरासाठी योगाला महत्त्व दिले जाते. शरीर तंदुरुस्त व अनेक
आजारांपासून आपण दूर राहतो. शरीराला व्यायाम मिळतो व शरीर बळकट होते.
शरीर मजबूत असेल तर मन मजबूत राहते. म्हणून आपण प्रत्येकानेच आपल्या आरोग्यावर
लक्ष दिले पाहिजे.
ध्यानातून आनंदमय व शांतीमय जीवन जगता येते. योग म्हणजे केवळ शरीराचा व्यायाम आणि श्वास रोखून धरणे नसून तुम्हाला वास्तवात जगण्याचा आनंद देणारा एक मार्ग आहे. म्हणून आपण प्रत्येकानेच स्वतःसाठी दररोज वेळ काढून योगासने केली पाहिजे व आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.
0 Comments